बंगळुरू (वृत्तसंस्था) भगवीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आरएसएस कार्यकर्ते वापरत असलेल्या खाकी चड्ड्या जाळण्याची मोहीम कर्नाटकातील विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसने राबवण्याचे जाहीर केले आहे. याचा निषेध करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन चड्ड्या गोळा करून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना देण्यासाठी बेंगळुरू येथील काँग्रेस मुख्यालयात पाठवण्यास सुरुवात केली आहे. आरएसएसच्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
गेल्या आठवड्यात, एनएसयूआयच्या काही सदस्यांनी, काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेने राज्याचे शिक्षण मंत्री बीसी नागेश यांच्या निवासस्थानाबाहेर खाकी शॉर्ट्सची (चड्ड्यांची) जोडी जाळली. राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकांच्या कथित भगवीकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यानंतर रविवारी कर्नाटकातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी एनएसयूआयच्या सदस्यांनी पोलिसांसमोर चड्ड्या जाळल्याचे सांगत आरएसएसची खिल्ली उडवली होती. त्यामुळे आता आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी चड्डी जाळणार आहोत असं ते म्हणाले होते. तसेच आरएसएस ही धर्मनिरपेक्ष संघटना नाही हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो आहे. दलित, ओबीसी किंवा अल्पसंख्याक समाजातील कोणी सरसंघचालक झाला आहे का? असा सवालही सिद्धरामय्या यांनी केला उपस्थित केला होता. यालाच आरएसएसकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील केआर पेटमधील RSS कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्यांच्या राज्यभर खाकी चड्डी जाळण्याच्या आवाहनाचा निषेध करत खाकी चड्ड्यांचं पार्सल सिद्धरामय्या यांना पाठवलं आहे. आरएसएस कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, विरोधी पक्षनेत्यांना आम्ही इतक्या चड्ड्या पाठवू, की ते कधीच जाळू शकणार नाहीत. दरम्यान, कार्यकर्त्यांनी गावोगावी-घरोघरी जाऊन चड्ड्या गोळा करण्याचं काम सुरु केलंय. सध्या शेकडो चड्ड्या एका बॉक्समध्ये पॅक करून बंगळुरू काँग्रेस कार्यालयात पाठवण्यात आल्या आहेत.