मुंबई (वृत्तसंस्था) मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क फिरणारे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर पोलिसांनी आज कारवाई करत दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, मंगेश चव्हाण यांनीही नियम हे सर्वांना सारखेच असतात असं म्हणत खुल्या दिलाने दंडाची पावती स्वीकारली.
राज्यावर कोरोनाचे नवे ओमायक्रॉनचे संकट घोंघावत आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. पण, लोकप्रतिनिधींना या नियमांचा विसर पडला आहे. असाच एक किस्सा आज घडला. मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क भिरणाऱ्या भाजपच्या आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. आ. मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार आहेत. मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्यानं ही कारवाई करण्यात आली. मंगेश चव्हाण यांना पोलीसांनी २०० रुपयांचा दंड ठोठवला. मंगेश चव्हाण यांनीही नियम हे सर्वांना सारखेच असतात असं सांगून ठोठावलेला दंड भरला. आमदारांवर कारवाई करणाऱ्या पोलीसांचं मंत्रालयात कौतुक होत आहे.