पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात गुरुवारी आंबील ओढ्यावरुन मोठा वाद पाहायला मिळाला. या सगळ्या प्रकरणावर आजच्या सामना अग्रलेखातून पुणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे. पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात आहे. गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवणं हा संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरे यांचे सरकार अत्यंत संवेदनशील पद्धतीने काम करीत असतानाच पुण्यात गरीबांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना निराधार, बेघर करण्यात आले. हा प्रकार धक्कादायक, संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा आहे. पुण्याच्या आंबिल ओढा परिसरातील नागरिकांचा आक्रोश एव्हाना सरकारच्या कानापर्यंत गेलाच असेल. या परिसरातील घरांवर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली व घरे पाडण्यास सुरुवात केली तेव्हा लोक रस्त्यावर उतरून ओक्साबोक्सी रडत असल्याचे चित्रण वृत्तवाहिन्यांनी दाखवले. महिला, लहान मुले, वृद्ध सगळय़ांच्या अश्रूचा बांध फुटला. ही घरे बेकायदेशीर असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. ती कायदेशीर की बेकायदेशीर ते नंतर पाहू, पण भरपावसाळय़ात घरांवर बुलडोझर फिरवून लोकांना रस्त्यावर आणणे हे अमानुष तसेच निर्घृण आहे,” असा संताप शिवसेनेने व्यक्त केला आहे.
“अनधिकृत, बेकायदेशीर घरांचा आणि झोपडय़ांचा प्रश्न मुंबईतच नाही तर पुणे, पिंपरी, चिंचवडसारख्या शहरातही वाढला आहे. झोपडपट्टय़ा गेल्याच पाहिजेत. त्यासाठीच तर सरकारने ‘एसआरए’सारख्या योजनांना बळ दिले, पण आपल्याला सुखाने राहावयाचे म्हणून झोपडपट्टय़ा जातील असे समजणे चुकीचे आहे. त्या सहजासहजी जाणार नाहीत. त्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरांचा प्रश्न सोडविल्याशिवाय व शेवटी मुंबई-पुण्यासारखी शहरे नेमकी कोणासाठी आहेत, हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही,” असं मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे.
“पुणे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. एरव्ही महापौर मोहोळ मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहोचतात, पण आंबिल ओढा गरीबांच्या अश्रूंनी वाहत असतानाही सगळेजण थंड बसले आहेत. बिल्डर जे कोणी आहेत ते आहेत. पण त्यांच्या सोयीसाठी ही निर्घृण कारवाई करण्यात आली आहे. ९ जुलैपर्यंत कोणतेही अतिक्रमण हटविण्यात येऊ नये, असा हायकोर्टाचा आदेश असतानाही महापालिकेने लोकांना बेघर केले. उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावीत ही घरे जमीनदोस्त करावी अशी कोणती घाई महापालिकेला होती? मुळात भर पावसाळय़ात आणि कोरोना महामारीचे संकट कायम असताना अशी तडकाफडकी कारवाई करण्याची गरजच नव्हती,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.
“मागील १५ दिवस याप्रश्नी नीलम गोऱ्हे धावपळ करीत आहेत. महापालिका आयुक्त एसआरए अधिकाऱ्यांना भेटत आहेत. तरीही मागचापुढचा विचार न करता महापालिकेने कारवाई करून अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. राज्याच्या नगरविकास खात्याने अखेर हस्तक्षेप केला आणि कारवाईला स्थगिती दिली. तसेच कोणालाही बेघर केले जाणार नाही याची ग्वाही दिली हे चांगलेच झाले. मात्र कोणाच्या तरी फायद्यासाठी गरीब जनतेला बेघर करण्याच्या वृत्तीचे काय, हा प्रश्न उरतोच. फक्त एसआरए प्रकल्पासाठी जागा रिकामी करायची असल्याने तुघलकी पद्धतीने हे बुलडोझर फिरवण्यात आले. पावसाळय़ात अशी अमानुष कारवाई करू नये, असे महापालिकेच्या बैठकीत ठरल्याचे भाजपच्याच आमदार मुक्ता टिळक सांगतात. तरीही इतकी भयंकर पद्धतीने कारवाई व्हावी हे कुणाचे उद्योग?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.