धुळे (प्रतिनिधी) मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे १० जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. याच गावाजवळ साधारणतः दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या १४ चाकी कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने या कंटनेरने सुरवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडविले. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या हॅाटेलमध्ये हा कंटेनर घुसून बाहेर पडला. या भीषण अपघातात हॉटेल परिसरात व हॅाटेलमध्ये असलले जवळपास १० जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कंटनर हॉटेलमध्ये शिरल्यानं अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहानं उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.