मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणात आता १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अगोदर याप्रकरणी गुन्हे शाखेकडून जेव्हा १० दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आली होती, तेव्हा न्यायालयाने सचिन वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावली होती.
गोरेगावमधील एका वसुली प्रकरणात सचिन वाझेला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. वाझेचा ताबा मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची कोठडी संपल्याने त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं असता त्याच्या कोठडीत १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
सचिन वाझे हिरेन प्रकरणाचाही आरोपी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्यात आली होती. ही गाडी वाझेंनी ठेवल्याचा आरोप आहे. या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोपही वाझेंवर आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी एनआयएकडून वाझेचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष एनआयए न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर वाझेचा ताबा पोलिसांना देण्यात आला.