धरणगाव (प्रतिनिधी) येथील साहित्य कला मंच या संस्थेच्या वतीने बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांनी बालकवींच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. उपस्थित सदस्यांनी नवनिर्माण होत असलेल्या बालकवी स्मारकाची पाहणी केली व पुढील वर्षभरातील कार्यक्रमाचे नियोजन केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी यांनी बालकवींचा समृध्द वारसा सांगून स्मारकासाठी केलेल्या प्रयत्नांची मांडणी केली. ना. गुलाबराव पाटील यांनी स्मारकासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल व कामाला गती दिल्याबद्दल त्यांचे संस्थेच्यावतीने आभार व्यक्त केले. सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी समाजात साहित्य आणि साहित्यिक यांच्याकडे होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. स्मारकामुळे साहित्यिक उपक्रमांना चालना मिळेल. यातून नव्या पिढीने लिहतं होवून हा वारसा पुढे न्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्याध्यक्ष डी. एस. पाटील यांनी स्मारक परिसरात वृक्ष लागवड करण्याची संकल्पना मांडली. उपाध्यक्ष डॉ. बापू शिरसाठ यांनी बालकवींच्या औदुंबर आणि श्रावणमास या कवितांचे अभिवाचन केले. अध्यक्षस्थानी जेष्ठ सदस्य वं. दे. लोहार होते. त्यांनी साहित्य कला मंचच्या ३५ वर्षाच्या संयमी वाटचालीचे फळ म्हणजे स्मारक असल्याचे गौरवोद्गार काढले.
होवू घातलेल्या स्मारकात बालकवींची प्रतिमा, खुले प्रेक्षागृह, कलादालन, सभागृह आणि वाचनालयाचे नियोजन आहे. त्यावर सर्वांनी समाधान व्यक्त केले. पुढील नियोजनात स्मारकाचे भव्य लोकार्पण, खान्देशस्तरीय साहित्य संमेलन, कथा-कवितेची कार्यशाळा, स्थानिकांचे कवी संमेलन आणि बालकवी पुरस्कारांचे वितरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहूल जैन यांनी तर आभार प्रदर्शन कैलास पवार यांनी केले. या प्रसंगी मुकेश तिवारी, विवेक लाड, श्रेयान्स जैन, सुधाकर विसावे, सखाराम माळी, भोजराज चौधरी यांसह अनेकांची उपस्थिती होती.