मुंबई (वृत्तसंस्था) क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आलेल्या सॅम डिसोझा यांनी आर्यन खानकडून कोणतेही ड्रग्ज जप्त न केल्याचा दावा केला आहे. तसेच किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असून आर्यन खान प्रकरणात त्याने समीर वानखेडेंच्या नावाने डील केली, त्याने प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडेंच्या नावाने सेव्ह केला आणि आपल्याला मध्यस्ती करण्याची विनंती केल्याचा गंभीर आरोप सॅम डिसोझा याने केला.
आर्यन खानला यातून बाहेर काढण्यासाठी गोसावीने ५० लाख रुपये घेतले होते पण मी त्याला पैसे परत करायला लावले असा दावा देखील डिसोझा यांनी केला आहे. सोमवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना डिसोझा यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची या कथित डीलमध्ये कोणतीही भूमिका नव्हती आणि गोसावी यांनी केवळ त्यांच्या संपर्कात असल्याचे नाटक केले होते. किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असल्याचे लक्षात आल्यानंतर डिसोझा यांनी दावा केला की त्यांनी गोसावीला पैसे परत केले.
गोसावीचा बॉडीगार्ड असलेल्या आणि या कथित ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने गेल्या महिन्यात डिसोझा यांच्याशी फोनवर बोलताना गोसावींना बोलताना ऐकल्याचा आरोप केल्यावर डिसोझा यांचे नाव पुढे आले होते. ज्यामध्ये दादलानीला २५ कोटी रुपये मागण्यात आले होते आणि त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असे साईलने म्हटले होते.
डिसोझा यांनी सांगितले की, “आम्ही तीन ऑक्टोबरच्या पहाटे ददलानी आणि गोसावी यांच्यात डील करण्यासाठी एकत्र भेटले होतो. ददलानी, तिचे पती, गोसावी, मी आणि इतर काही जण तीन ऑक्टोबरला पहाटे चारच्या सुमारास लोअर परेल येथे भेटलो. त्यानंतर मी तेथून निघून गेलो आणि नंतर गोसावीने आर्यनला “मदत” करण्यासाठी दादलानीकडून ५० लाख रुपये घेतले होते अशी माहिती मला मिळाली. लोअर परळमधील भेटीदरम्यान गोसावीला फोन आला आणि त्यावर समीर सर असा कॉलर आयडी दाखवत होता. पण गोसावीने त्याच्या मोबाइलमध्ये प्रभाकर साईल याचा नंबर समीर वानखेडे नावाने सेव्ह होता आणि डील करताना आपण वानखेडे यांच्याशी बोलत असल्याचे त्याने दाखवले, असे डिसोझा म्हणाले.
“किरण गोसावीचा खोटेपणा माझ्या नंतर लक्षात आला. कारण त्याच्या मोबाइलमध्ये प्रभाकर साईल याचा नंबर समीर वानखेडे नावाने सेव्ह होता आणि ट्रू कॉलरवर मला ते दिसले. या भेटीनंतर काही तासांतच गोसावीवर दबाव आणून पैसे परत दिल्याची मी खात्री केली,” असा दावा डिसोझा यांनी केला. या छाप्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे डिसोझा यांनी सांगितले. त्यांनी दावा केला की, “एक ऑक्टोबर रोजी सुनील पाटील या पॉवर ब्रोकरचा फोन आला होता. पाटील यांनी मला सांगितले की, त्यांना दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कॉर्डेलियावर ड्रग्जपार्टी विषयी काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पाटील यांनी मला एनसीबीला ही माहिती देण्यास सांगितले. म्हणून मी गोसावींना फोन करून दोघांची ओळख करून दिली,” असे डिसोझा म्हणाले.
डिसोझा यांच्या म्हणण्यानुसार, आर्यनच्या अटकेनंतर गोसावीने आर्यनला दादलानीशी बोलायचे आहे असे सांगण्यासाठी फोन केला. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते त्यामुळे त्याला मदत करायची आहे असे गोसावीने सांगितले होते. आपण काही मित्रांच्या माध्यमातून ददलानीच्या संपर्कात आल्याचा दावा डिसोझा यांनी केला.