जळगाव (प्रतिनिधी) येथील रायसोनी नगरात चालक पळविल्याच्या वादावरून वाळू व्यावसायिकाने एका तरुणाला अडवून डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रारदार तरुण व संशयित या दोघांची तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, वाळूचा व्यवसाय करणाऱ्या सोनू आढाळे याने रस्त्याने जाणाऱ्या अर्जुन रोहिदास राठोड (२२, रा. पंचमुखी हनुमान मंदिर परिसर) या तरुणाला अडवून डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी ४ वाजता रायसोनी नगरात घडला. पिस्तूलबाबत पोलिसांनी इन्कार केला आहे. याप्रकरणी तरुण व संशयित या दोघांची तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली आहे.
या घटनेबाबत अर्जुन रोहिदास राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी रायसोनी नगरातील एक ड्रायव्हिंग स्कूल चालकाच्या घरी जात असताना वाळूचा व्यवसाय करणाऱ्या सोनू आढाळे याने मेडिकल जवळ अडवून तु माझ्या वाहनावरील चालकाला का पळविले आणि दुसऱ्या वाहनावर परत कामाला लावून दिले असा जाब विचारला. त्यावर कोणता चालक, मी ओळखत नाही, हे प्रकरण माहित नाही असे सांगितले असता सोनू याने कमरेतून पिस्तुल काढून डोक्याला लावत शिवीगाळ केली. तेथे वाद झाल्यानंतर आपण थेट रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. दरम्यान, पिस्तूलचा वापर झाला नाही,अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली आहे.