पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) रेल येथे वाळू उपसा करणाऱ्यांना काहि शेतकऱ्यांनी वाळू उपसा करू नका, अशी विनवणी केली. परंतु, विनवणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर त्यांनी हल्ला चढवून ५ जणांना – जखमी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाळधी पोलिसांत १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथून जवळच असलेल्या रेल येथे मध्यरात्रीच्या सुमारास कानळदा येथील काहि जण गिरणा नदी पात्रातून वाळूचा उपसा करत असल्याची माहिती मिळाली. – त्यामुळे गावातील शेतकरी नरेंद्र पाटील, श्रीकांत पाटील, संदिप – पाटील, मंगल पाटील, मनोज पाटील हे तेथे पोहोचले व त्यांनी वाळू माफियांना, तुम्ही वाळूचा उपसा करू नका, अशी विनवणी केली. तसेच यामुळे आमच्या शेतातील विहिरींची जलपातळी कमी होत असल्याचे सांगितले. तर याचा वाळू माफियांना राग आला अन् त्यांनी हातातील फावड्याने शेतकऱ्यांना मारहाण केली. यात संदीप पाटील डोक्याला व पाठीला गंभीर इजा झाली आहे. तर, मनोज पाटील, श्रीकांत पाटील, मंगल पाटील, नरेंद्र पाटील यांनाही मारहाण झाल्याने ते ही जखमी झाले आहेत. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गणेश सोनवणे, रामकृष्ण सपकाळे, श्रावण इंगळे, गोरख सपकाळे, विशाल सपकाळे, राजेंद्र सपकाळे, शरद सपकाळे, संदीप सोनवणे, सागर सोनवणे, दिनेश सोनवणे, भाऊसाहेब सपकाळे, ज्ञानेश्वर सपकाळे, गणेश सपकाळे, कृष्णा सपकाळे, प्रवीण सपकाळे, शरद सपकाळे (सर्व रा. कानळदा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील करत आहेत.
















