जळगाव (प्रतिनिधी) शासकीय कामात अडथळ्यासह वाळू वाहतुकीचे सहा गंभीर गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संजय सुरेश त्रिभुवन (वय-२६ रा.वाक ता. भडगाव) याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश शनिवारी सायंकाळी काढले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले तसेच औषधीजन्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि विनापरवाना वाळू तस्कर करणारे, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानबध्द आणि हद्दपारी कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेले आहेत. या अनुषंगाने भडगाव तालुक्यातील वाक येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याला स्थानबद्धतेची कारवाई करण्यासाठी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पाठवला. या प्रस्तावाचे अवलोकन करून स्थानबद्ध करण्याच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी प्रस्तावाला मंजुरी देत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. वाळू माफियांविरूध्द भडगाव तालुक्यातील ही दुसरी कारवाई आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सहाय्यक फौजदार यूनूस शेख इब्राहीम, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, पोकॉ. प्रवीण परदेशी, संदीप सोनवणे, जितू राजपूत अशांनी रेकॉर्ड वरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याला ताब्यात घेत नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.