मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांसमोरून पळ काढणाऱ्या मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यासह संतोष धुरी यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात असताना संदीप देशपांडे हे आपल्या खासगी गाडीत बसून वेगात निघून गेले. यावेळी झालेल्या गोंधळात एक महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडली होती. देशपांडे यांच्या गाडीचा धक्का लागल्यानेच सदर महिला पोलीस पडल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या संतोष धुरी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संदीप देशपांडे हे काल रात्रीपासून गायब आहेत. मी वकिलांचा कायदेशीर सल्ला घेत असल्याचं त्यांनी एका व्हिडिओतून स्पष्ट केलं होतं. मात्र आता गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांकडून देशपांडे यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.