सांगली (वृत्तसंस्था) म्हैसाळ येथील ९ जणांच्या सामुहिक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तब्बल २५ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात हे अवैध सावकारी प्रकरणी आणि आत्महत्येस केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल झाले असून जवळपास ११ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे.
म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये सोमवारी (20 जून) दोन सख्ख्या भावाच्या कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आले होते. प्राथमिक माहितीनुसार सांगलीतील मिरज परिसरात राहणाऱ्या या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिरज तालुक्यातील म्हैसाळच्या अंबिकानगर भागातील एका घरात काल नऊ जणांचे मृतदेह सापडले होते. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन सख्ख्या भावांच्या संपूर्ण कुटुंबातील हे सर्व मृतदेह आहेत. तपासात कोणाच्याही अंगावर जखमेच्या खुणा आढळलेल्या नाहीत. दोन्ही भावांच्या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. याशिवाय घटनास्थळावरुन कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे एसपी आणि आयजीही घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांनी फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण केले होते. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही सामूहिक आत्महत्या आहे की अन्य कारणे आहेत याचाही तपास सुरु आहे.
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा संशय
सध्या या सर्व मृतदेहांसोबत कोणतीही सुसाईड नोट न मिळाल्याने कर्जबाजारी होऊन या दोन भावांच्या कुटुंबीयांनी ही सामूहिक आत्महत्या केली असावी, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. एका खोलीत तीन मृतदेह तर दुसऱ्या खोलीत सहा मृतदेह सापडले. दरम्यान आर्थिक, सावकारीच्या जाचातून वनमोरे कुटुंबाने आत्महत्या केल्याचा संशय असला तरी सुशिक्षित कुटुंबाने व्याजाने पैसे घेऊन नेमके कुठे गुंतवले? याचाही पोलिसांना उलगडा करावा लागणार आहे.
















