मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते व राज्याचे वनमंत्री संजय राठोड संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. भाजपनं संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवं राजकीय संकट उभं राहिलं आहे.
पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून विरोधक आक्रमक झाले होते. त्यातच संजय राठोड यांनी आपला राजीनामा सोपवला असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एकीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचे नाव न घेता चौकशीची मागणी करणारे पत्र पोलीस महासंचालकांना दिले असताना या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समाजमाध्यमांमध्ये ध्वनिफितीसुद्धा फिरत आहेत. त्यामुळे बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थता असून याप्रकरणी सखोल चौकशी करावी,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवून केली होती.
फडणवीस यांनी कोणाचंही नाव घेणं टाळलं असताना शुक्रवारी रात्री भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे थेट नाव घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या सगळ्या तपशिलांचा रोख शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. पोलिसांनी स्वत: (स्यु-मोटोतंर्गत) तक्रार दाखल करत संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल आणि व्यवस्थित चौकशी होऊन सत्य लोकांसमोर येईल. त्यानंतर गरज पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांची ही भूमिका म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरले आहे. त्यामुळे शिवसेनेवर संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव वाढत आहे.