मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आताच दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बजारा समाजाची तरूणी पूजा चव्हाण हिच्या दुदैवी मुत्यूवरून विरोधी पक्षानी घाणेरडे राजकारण केले गेले. माझ्या समाजाची बदनामी केली गेली. म्हणूनच यातील खरे सत्य बाहेर यावे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशीच माझी भूमिका आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी म्हणाले की, विरोधी पक्षाने घाणेरडं राजकारण करुन माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या प्रकरणातून सत्य बाहेर यावे, यासाठी मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे राठोड म्हणाले. राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!” पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील नाराजीचा सूर आळवला आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यांवर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दबाव वाढत चाललाय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राजीनामा देण्याआधी काय घडलं?
राठोडांवर कारवाई न केल्यास अधिवेशनाचं कामकाज चालवू देणार नाही, असा इशारा विरोधीपक्ष असलेल्या भाजपानं दिला होता. उद्यापासून अधिवेशन सुरू होतं असून, आज (२८ फेब्रुवारी) संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास संजय राठोड हे पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. यावेळी चर्चा झाली. राठोड यांनी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली तसेच त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला.