मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिवसेना- राणे वादाच्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावर भाष्य करत संजय राऊतांना अंतर्गत धोका निर्माण झाला असावा, असा टोला लगावला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. राऊत हे सतत मीडियासमोर असतात. त्यामुळे पक्षव कोण चालवतंय हे सर्वांना दिसतंय. त्यामुळेच बहुतेक त्यांना अंतर्गत धोका निर्माण झाला असावा, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
आशिष शेलार यांनी आज वांद्रे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या सुरक्षेवरून प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना शेलार यांनी हा टोला लगावला. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात. त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतंय. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असावा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, असा टोला शेलार यांनी लगावला. राज्यातले थिअटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी आघाडीतला एक राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा, मग निर्बंध शिथिल करू, असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करावेत, अन्यथा आम्ही नाव जाहीर करू, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे. वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात. जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले “वाटघाटी” झाल्या. वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते. तर दुसरीकडे घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धुप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत. वाटाघाटी करु शकत नाहीत. वाटा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरु आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा. आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवाल त्यांनी केला.