मुंबई (वृत्तसंस्था) शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले होते. यानंतर विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेऊन चौकशी केली होती. आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीने आज चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली असून सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले आहेत. तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर ईडीने अखेर विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले. त्यांना अधिक चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले.
संजय राऊत यांनी भाजपवर साधला निशाणा
शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला . यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू असा इशाराच संजय राऊत यांनी मोदी सरकारला दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘ईडी ज्यांचे आदेश पाळत आहेत. त्यांच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय उद्योगधंदे आहेत, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालते, निवडणुकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो, कोणत्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वैगेरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे. प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही.’