नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बचत आणि गुंतवणूक (Saving and Investment) या दोन्ही गोष्टी सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहेत. बचत केल्यास गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही केलेली छोटी बचतही फायदेशीर ठरू शकते. नवीन वर्षात छोटी गुंतवणूक करून चांगला रिटर्न (How to get Good Return) मिळवायचा असेल तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund PPF) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. केंद्र सरकारची गॅरंटी असणाऱ्या या स्कीममध्ये तुम्ही हजार रुपये गुंतवून लाखोंचा फंड मिळवू शकता.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये गुंतवणुकीची जोखीम खूपच कमी आहे कारण ती सरकारद्वारे पूर्णपणे संरक्षित आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला नफाही मिळू शकतो. आपण फक्त काळजीपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून PPF मधून चांगले रिटर्न मिळू शकतात. दर महिन्याला फक्त १००० रुपये जमा करून तुम्ही १२ लाख रुपयांपेक्षा जास्त मिळवू शकता. राष्ट्रीय बचत संस्थेने १९६८ मध्ये लहान वचत म्हणून याची सुरुवात केली.
किती व्याज असेल ?
केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत PPF खात्यावरील व्याजदरात बदल करते. व्याज दर सामान्यतः ७ टक्के ते ८ टक्के असतो, जो आर्थिक परिस्थितीनुसार थोडा वाढू किंवा कमी होऊ शकतो. सध्या, व्याज दर ७.१ टक्के आहे, जो वार्षिक चक्रवाढ आहे. ही रक्कम अनेक बँकांच्या FD पेक्षा जास्त आहे. तुम्ही PPF खात्यात दरवर्षी किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता. त्याची मॅच्युरिटी पिरियड १५ वर्षे आहे. यानंतर, तुम्ही हे पैसे काढू शकता किंवा तुम्ही दर ५ वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करू शकता.
पूर्ण योजना काय आहे ?
जर तुम्ही PPF खात्यात दर महिन्याला १००० रुपये जमा केले तर १५ वर्षात तुमची गुंतवणूक रक्कम १.८० लाख रुपये होईल. यावर १.४५ लाख रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एकूण ३.२५ लाख रुपये मिळतील. आता तुम्ही PPF खाते आणखी ५ वर्षे वाढवल्यास आणि दरमहा १००० रुपये गुंतवत राहिल्यास, तुमची एकूण गुंतवणूक रक्कम २.४० लाख रुपये होईल. या रकमेवर २.९२ लाख रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे मॅच्युरिटीनंतर तुम्हाला ५.३२ लाख रुपये मिळतील. जर तुम्ही १५ वर्षाच्या (एकूण तीस वर्षे) मॅच्युरिटी कालावधीनंतर ५-५ वर्षासाठी ती तीनदा वाढवली आणि दरमहा १००० रुपयांची गुंतवणूक करत राहिल्यास तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम ३.६० लाख रुपये होईल. यावर ८.७६ लाख व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे एकूण १२.३६ लाख रुपये मॅच्युरिटीवर उपलब्ध होतील.
तुम्ही गरजेनुसार कर्जही घेऊ शकता
तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल, तर या खात्यावर कर्ज घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. पण याचा फायदा घेण्यासाठी ते खाते उघडण्याच्या तिसऱ्या किंवा सहाव्या वर्षी उपलब्ध होईल. PPF खात्याची ६ वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही थोडे पैसेही काढू शकता.