हिंगोली (वृत्तसंस्था) मित्रा वाचव रे…अशी सोबत पोहणाऱ्या मित्राची आर्त हाक ऐकून बुडणाऱ्या मित्राच्या मदतीला तो धावला पण अपयश आले. कळमनुरी तालुक्यातील बोथी तलावामध्ये तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.२७ रोजी दुपारी २ वाजता घडली. तब्बल १८ तासानंतर बुडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला. दीपक किशनराव मारकळ (वय २१, रा. बोथी, ता. कळमनुरी) असे मयत तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, कळमनुरी तालुक्यातील बोथी येथील दीपक मारकळ आणि त्याचा मित्र रायाजी विठ्ठल खंदारे हे दोघं जण २७ मे रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास बोथी तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात पोहत असताना अचानक दीपकला वात आला. सोबत पोहत असलेल्या मित्राला त्याने आवाज देऊन मला वात आला, मला वाचव अशी आर्त हाक दिली. त्यामुळे रायाजीने त्याच्याकडे धाव घेतली. दीपक बुडताना वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याच्या केसाला धरून दोन वेळा पाण्याबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचे प्रयत्न निष्कळ ठरले. अखेर दीपक त्याच्या हातून निसटला आणि पाण्यात बुडाला. ही खबर त्याने बाहेर येऊन ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थांनीही त्याचा शोध घेतला. परंतु, तो काही सापडला नाही. त्यानंतर तब्बल 18 तासानंतर रविवारी ता. 28 सकाळी सात वाजता दीपकचा मृतदेह सापडला. मयत दीपक हा बीएचे शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.