छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) ताई, मला माफ कर…अशा आशयाची चिठ्ठी लिहून ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच एका २६ वर्षीय युवकाने आपल्या बहिणीच्या घरीच आत्महत्या हृदयद्रावक घटना घडली आहे. भावाच्या अशा अचानक जाण्याने बहिणीसह कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. आकाश सर्जेराव शिंदे (२६) मूळ गाव खैरका (ता. मुखेड, जि. नांदेड ह. मु छत्रपती संभाजीनगर, बजाजनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
आकाश हा बहिण सुनंदा गोविंद गोंधळे यांच्याकडे राहात होता. हे तिघेही कंपनीत काम करत होते. बुधवारी सकाळी आकाशची बहीण व भाऊजी हे दोघेही कंपनीत कामासाठी गेले होते. तर आकाश घरी एकटाच होता. दरम्यान, ४ वाजेच्या सुमारास बहीण घरी आली. तिने दरवाजा वाजविला मात्र, आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता, आकाशने साडीच्या साह्याने फॅनला गळफास घेतल्याचे दिसले. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटेसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यास बेशुध्दावस्थेत शासकीय रुग्णालात दाखल केले. परंतु त्यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आकाशने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. आज माझा शेवटचा दिवस आहे. मरणालाही नशिब लागते. वडील गेल्यापासून मी तणावात आहे. आईचा सांभाळ कर. ताई, मला माफ कर, असे चिठ्ठीत नमुद केले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या घरी भावाने आत्महत्या केल्यामुळे बहिणीने काळीज चिरणारा आक्रोश केला होता. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.