नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्यासाठी जुलै महिना उजाडेल असा अंदाज ३ वैज्ञानिकांच्या पॅनलने वर्तवला आहे. विद्यान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हे पॅनल गठीत केले आहे. पुढच्या ६ ते ८ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट धडकण्याची शक्यताही या वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.
भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयांतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन सदस्यांच्या पॅनेलने हे अंदाज बांधले आहेत. SUTRA मॉडेलचा वापर करुन शास्त्रज्ञांनी अशी भविष्यवाणी केली आहे, की मे महिन्याच्या शेवटापर्यंत दररोज जवळपास १.५ लाख कोरोना रुग्ण आढळतील. तर, जूनपर्यंत ही संख्या घटून २०,००० जाईल. पॅनलमधील एक सदस्य आणि आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं, की महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि गोवासारख्या राज्यांनी अधिक रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे.
या मॉडेलनुसार, तमिळनाडूमध्ये २९ ते ३१ मेदरम्यान कोरोना उच्चांक गाठेल. तर, पुद्दपचेरीमध्ये १९-२० मे रोजी रुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळेल. आसाममध्ये २०-२१ मे, मेघालय ३० मे, त्रिपुरा २६-२७ मे, हिमाचल प्रदेश २४ मे तर पंजाबमध्ये २२ मेपर्यंत कोरोना उच्चांक गाठेल, अशी शक्यता आहे.
मॉडेलनुसार, कोरोनाची तिसरी लाट सहा ते आठ महिन्यांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणामही उशिरा जाणवू शकतो. “लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढली असेल त्यामुळे अनेकजण तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित असतील,” अशी मााहिती अग्रवाल यांनी दिली आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार नाही असंही ते म्हणाले आहेत.