नागपूर (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. त्यात नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार हे उघड आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.
नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी दिल्लीत राहुल गांधी पत्रकारपरिषद घेणार आहेत. यावेळी नाना पटोले यांच्या नावाची घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला विदर्भात यश मिळाल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत उडी घेतली होती. ‘काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील मंत्र्याला मिळावं’ अशी मागणी धानोरकरांनी केली आहे. बाळू धानोरकर यांनी हायकमांडची भेट घेत विदर्भासाठी दावेदारी केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा आहे.
प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांचीही नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्या पुनरागमनाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजीव सातव यांना दिल्लीतून सोडण्यास हायकमांडने नकार दिला आहे. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतही काँग्रेसमधला एक वरिष्ठ नेत्याचा गट सक्रिय होता. मात्र या दोघांऐवजी नाना पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. नाना पटोले यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा ही प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतही चर्चा केल्याचं समजत आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याची ही चर्चा सुरु होईल.