श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून चार अतिरेक्यांना ठार करण्यात आलंय. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून मारण्यात आलेले अतिरेकी लश्कर ए तोयबाचे असल्याचं सांगण्यात येत आहे. शोपियां जिल्ह्याच्या रावळपोरा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.
या अतिरेक्यांकडे एक एके४७ आणि दोन पिस्तुल सापडल्या होत्या. यापूर्वी शोपियां जिल्ह्याच्या रावळपोरा येथे तीन दिवसांपासून चकमक उडाली होती. त्यात एक अतिरेकी मारला गेला. या चकमकीत दहशतवादी विलायत हुसैन ऊर्फ सज्जाद अफगानी याला तीन दिवसानंतर मारण्यात सुरक्षा दलाला यश आलं होतं. अफगाणी हा रावळपोरा येथील राहणारा होता. तो २०१८मध्ये तो दहशतवादी बनला होता. लश्कर ए तोयबाने या संपूर्ण परिसराची त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. मात्र त्याने नंतर लश्कर हे तोयबाला सोडलं होतं. त्यानंतर तो जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेत सामील झाला होता.
२०१८नंतर शोपियांमध्ये बऱ्याच काळापासून तो लपूनही बसला होता. त्यामुळे त्याला मारणं हे सुरक्षा दलाचं मोठं यश असल्याचं मानलं जात आहे. तर जैशसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी शनिवारी शोपियांच्या रावळपोरा येथे २० तास कॉर्डन आणि सर्च ऑपरेशन सुरू होतं. त्यानंतर अतिरेकी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक उडाली. चकमकीच्या पहिल्याच दिवशी सुरक्षा दलाने एका अतिरेक्याला कंठस्नान घातलं होतं. जहांगीर अहमद वानी असं या अतिरेक्याचं नाव होतं. तो शोपियांचा रहिवासी होता.