मुंबई (वृत्तसंस्था) कू्झवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला आर्यन खानच्या जामीन याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. दरम्यान गुरुवारी सकाळीच बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहोचला होता. मात्र या भेटीदरम्यान शाहरुखला आर्यनला पाहून अश्रू अनावर झाले. त्यानंतर तुरुंगामधील अधिकाऱ्यांनी त्यांना शांत केलं.
शाहरुख आणि आर्यन यांची भेट १२ क्रमांकाच्या काऊंटरवर झाली. ते इंटरकॉमच्या माध्यमातून एकमेकांशी बोलले. कोरोना नियमांमुळे या दोघांमध्ये काचेची भिंत होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिले काही मिनिटं दोघेही नुसते एकमेकांना पाहत बसले होते. मात्र थोड्यावेळाने शाहरुखच्याच भावनांचा बांध फुटला आणि त्याला रडू आलं. आपल्या वडीलांना रडताना पाहून मग आर्यनही मोठ्याने रडू लागला. त्यानंतर तुरुंगामधील अधिकाऱ्यांनी दोघांना शांत केल्याचं एका वृत्तात म्हटलं आहे.
आर्यनने शाहरुखला, “मला माफ करा,” असं म्हटलं. त्यावर शाहरुखने, “मला तुझ्यावर विश्वास आहे. मला सध्या फार दु:ख होतं आहे,” असं शाहरुख म्हणाला. त्यानंतर शाहरुखने तू काही खाल्लं का असं आर्यनला विचारलं. यावर आर्यनने नकारात्मक उत्तर दिल्यानंतर शाहरुखने तुरुंग अधिकाऱ्यांना आर्यनसाठी घरुन काही पाठवता येईल का अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी यासाठी तुम्हाला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल असं सांगत त्या परवानगीशिवाय तुम्हाला आर्यनला घरचं जेवण देता येणार नाही असं म्हटलं. यानंतर शाहरुखने इतर कैद्यांकडे आर्यनची काळजी घेण्याची विनंती केली. तसेच शाहरुखने तुरुंगाबाहेर पडताना इतर कैद्यांना भेटायला आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना हात जोडून अभिवादन केल्याचं पहायला मिळालं.