मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील मोठ मोठे प्रकल्प गुजरातला जात असताना आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गुजरातला पाठवा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी काही नेत्यांसह राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हस्तक आहेत. औरंगाबाद येथील सभेत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कबुली दिली आहे की, ते मोद व शहांचे हस्तक आहेत. हे दोन्ही नेते महाराष्ट्राचे हस्तक नाही. नाना पटोले म्हणाले की, केवळ मोदी-शहांचे हस्तक असलेल्या शिंदे-फडणवीसांनाही आता गुजरातला पाठवा, अशी भूमिका आम्ही राज्यपालांसमोर मांडली आहे. राज्यपालांनी मात्र यावर काय प्रत्युत्तर दिले, हे नाना पटोलेंनी सांगितले नाही.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मविआ काळात 23 कंपन्यांनी केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली आहे. यावरही नाना पटोलेंनी टीकास्त्र सोडले. नाना पटोले म्हणाले की, उद्योगमंत्र्यांना काळी पत्रिका काढायची आहे की निळी पत्रिका हे त्यांनीच ठरवावे. सत्य काय आहे, हे सर्वांना माहित आहे. जनतेपासून काही लपत नाही.
केंद्रीय तपास यंत्रणांवरुनही नाना पटोलेंनी भाजप व शिंदे सरकारवर टीका केली. नाना पटोले म्हणाले की, राज्यात सध्या ईडीचे सरकार आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभाग अशा यंत्रणांचा गैरवापर करुनच हे सरकार बेकायदेशीरपणे स्थापण्यात आले आहे. तपास यंत्रणांच्या गैरवापरावरच राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचे अस्तित्व अवलंबून आहे.