जळगाव (प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी आज सकाळी ‘नालायक लोकप्रतिनिधींची मांदियाळी’, या शीर्षकाखाली सोशल मीडियात टाकलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. जळगाव जिल्ह्यासह गुजरात आणि मध्यप्रदेशातील प्रवासानंतर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आलेल्या अनुभवावर ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये जळगाव जिल्ह्यातील आमदार, खासदार विकासाच्या नावावर कसे शेण खात असावेत ? हा अनुभव घ्यायचा तर पारोळा-चोरवड-वलवाडी-भडगाव या रस्त्यावरून प्रवास करावा, असे म्हणत श्री. तिवारी यांनी लोकप्रतिनिधींवर सडकून टीका केली आहे.
दिलीप तिवारींची पोस्ट जशीच्या तशी
कौटुंबिक मंगल कार्य आणि नंतरच्या सोपास्कारात व्यस्त होतो. निमित्त असल्यामुळे गुजरातमधील पावागड, निळकंठेश्वर आणि स्टैच्यू आॕफ युनिटी येथे पर्यटनासाठी जावे लागले. जळगावहून धरणगाव, शिरपूरमार्गे छोटा उदयपूर, अलिराजपूरवरून इच्छित स्थळाकडे गेलो. महाराष्ट्राच्या सिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. रस्त्यांवर केवळ खड्डे नाहीत. खडी उखडली असून मातीचे ढीगारे आहेत. रस्त्याला भेगा, चिरा पडल्या आहेत. चारचाकी वाहनातून प्रवास म्हणजे जिवाला घोर आहे. बेशरम, निर्लज्ज, हलकट आणि गांडू लोकप्रतिनिधींमुळे प्रत्येक तालुक्यातील प्रवाशाला कशा-कशा नरक यातना भोगाव्या लागतात याचा संतप्त अनुभव येतोय. जळगाव जिल्ह्यातील आमदार, खासदार विकासाच्या नावावर कसे शेण खात असावेत ? हा अनुभव घ्यायचा तर पारोळा-चोरवड-वलवाडी-भडगाव या रस्त्यावरून प्रवास करावा. असाच अनुभव मलकापूरहून बोदवड रस्त्यावर घेतला.
याच्या अगदी उलट अनुभव मध्यप्रदेश व गुजरातमधील राज्यात आला. जिल्हा, राज्यमार्गासोबत गाव पाडे जोडणारेही रस्ते डांबरी व सिमेंटचे झालेले आहेत. मध्यप्रदेश सरकारने पर्यटनस्थळांना जोडणारे रस्ते काँक्रिटचे केले असून त्यावरून अवजड वाहनांना बंदी केली आहे. अगदीच जवळचे उदाहरण म्हणजे धुळे-इंदूर महामार्गाजवळून मांडूवरून रतलामकडे जाणारा रस्ता. कमी वर्दळीचा. अगदी फास्ट ट्रैकचा अनुभव देणारा.
मध्यप्रदेश व गुजरातमध्ये केलेले डांबरी रस्ते उत्कृष्ट पृष्ठभागाचे आहेत. पोटातले पाणी हलत नाही. ताशी ६० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहने पळवता येतात. टोल सुद्धा फारसे नाहीत. आपल्याकडे रस्ते डांबरीकरणाचे काम पुढाऱ्यांचे बगलबच्चे, लाळघोटे व तळी उचलणारे निर्लज्ज ठेकेदार करतात. खडीकरण, डांबरीकरण केले जाते. रोलरही फिरतात. पण पृष्ठभाग हा टीप्पर पद्धतीचा म्हणजे ओबडधोबड, वरखाली असतो. वाहन धावताना थरथरते, हेलकावे खाते. उड्या मारत वाहन धावत असल्याचा भास होतो. पहिल्या पावसाळ्यात पृष्ठभाग उखडला जातो. अशा रस्त्यावर ताशी ४० किलोमीटर सुद्धा वाहन धावत नाही. साईडपट्टी हा विषय वेडपट, खूळचट व नेळभट आमदार-खासदारांना समजत नाही. जळगाव शहर आणि कोणताही तालुका जोडणारा रस्ता अगदी उत्तम स्थितीत व बिन खड्ड्यांचा आहे, हे कोणत्याही लोकप्रतिनिधीने दाखवावे. सध्या अपवाद जळगाव-धरणगाव व अमळनेर रस्त्याचा आहे. बाकी सर्व रस्त्यांचे काम ठिगळ लावलेले सुरू आहे. हाच अनुभव मलकापूरहून बोदवड रस्त्याचा घेतला. अगदीच भिक्कार अवस्था.
निळकंठेश्वरधाम येथून परत निघताना अलिराजपूर साठीचा रस्ता गुगल मैपवरील नकाशामुळे चुकला. आमचा वाहनचालक महेश पाटील हा सातपुड्याच्या ४,५ व ६ व्या माळेत भरकटला. आदिवासी भागात पाडे, वस्त्या आणि निबीड जंगलातून सायंकाळी आमची गाडी धावली. अंधार गडद होण्यापूर्वी बाहेर पडावे अशी प्रार्थना करीत होतो. चालकानेही जवळपास ७०/८० च्या स्पीडने गाडी पळवली. ७०/८० किलोमीटर फेरा पडला. पण एक गोष्ट अनुभवली. ती म्हणजे, आदिवासी भागात सर्वच पाडे, वस्त्या या उत्तम डांबरी रस्त्याने जोडलेल्या आहेत. पोटातले पाणी हलत नाही हाच अनुभव.
गुजरात व मध्यप्रदेशात भाजप नेतृत्वातील सत्ता आहे. राजकारणात छीं … थू … करायाची म्हणून भाजपमधील मोदी-शहा यांच्यासह कोणालाही शिव्या घालणे सोपे आहे. पण तेथील लोकप्रतिनिधींना मतदार संघात रस्ते तयार करून घेणे कसे शक्य होत असावे ? हा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातही रस्त्यांचे ठेकेदार आहेतच. पण कमिशनखोरीमुळे त्यांची गणना ब्लैक लिस्टेड मध्ये होत आहे. मोदी-शहाच्या नावाने निवडलेले महाराष्ट्रातील आमदार, खासदारही हलकटच आहेत.
जळगाव जिल्ह्यातील आमदार, खासदार तेवढेच निर्लज्ज आहे. जळगाव शहरात असलेल्या महामार्गाचे चौपदरीकरण अगदी टूकार पद्धतीने सुरू आहे. रस्त्याचे पहिले काम पावसात उखडले. वृत्तपत्रात फोटो-बातम्या आल्या. कोणत्याही लोकप्रतिनिधीने महामार्ग प्राधिकरणला जाब विचारला नाही. आम्ही ८/९ जण कलेक्टरांकडे गेलो. तक्रारी केल्या. अखेर २/३ दिवसांपूर्वी कलेक्टरांनी पाहणी केली. तरीही कामात सुधारणा नाही. जळगावचे दुर्भाग्य आहे, येथे लोकप्रातिनिधी जनतेसाठी भांडत नाहीत. एक दुसऱ्याला तुरुंगात टाकायला भांडतात. गांडू लोकप्रतिनिधींसोबत मत देणारेही षंढ होत जातात. हाच इतिहास सध्या लिहिला जातोय.
(वैधानिक इशारा – या पोस्टमध्ये आमदार, खासदार यांना उद्देशून गांडू, निर्लज्ज, बेशरम हे शब्द वापरले आहे. ते वाचून ज्याचा कोणाचा अवमान होत असेल त्याने ते स्वतःसाठी लिहिल्याचे सिद्ध करावे.)