जळगाव । प्रतिनिधी – जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, दै . साईमतचे वरिष्ठ उपसंपादक (मानद) व शहरातील पत्रकार कॉलनीतील (खेडी परिसर ) रहिवाशी हेमंत काळुंखे यांचे आज (बुधवार) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
त्यांच्या पार्थिवावर उद्या (गुरूवार) सकाळी दहा वाजता जळगावातील नेरी नाका वैकंुठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हेमंत काळुंखे यांनी त्यांच्या पत्रकारितेतील कारकिर्दीची सुरूवात दै. जनशक्तीपासून केली होती. २००७ सालापासून ते दै. साईमत परिवाराशी जोडले गेलेले होते. दैनिकातील विविध कामांच्या जबाबदाऱ्यांचा प्रदीर्घ अनुभव असला तरी प्रामुख्याने मनोरंजन, नाटक, सिनेमा, गायन, वादन हे त्यांचे व्यासंगाचे विषय होते. सध्याच्या काळातील आधुनिक सुविधांच्या तुलनेत संसाधनसंपन्नता नसलेल्या जुन्या पिढीतील पत्रकारितेत हेमंत काळुंखे यांनी केलेले जिल्ह्यातील सहकार व शिक्षणक्षेत्राला दिशा दाखवणारे वृत्तांकन, विश्लेषण गाजलेले होते. मनमिळावू स्वभाव, सतत कार्यमग्नता व सहकार्याची वृत्ती या स्वभाववैशिष्ट्यांमुळे हेमंत काळुंखे समाजातील विविध घटकांमधल्या दांडग्या जनसंपर्काचेही धनी होते.
हेमरत्न काळुंखे व मकरंद काळुंखे यांचे ते वडील होत. हेमंत काळुंखे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
















