मुंबई (वृत्तसंस्था) जेष्ठ अभिनेत्री जयंती यांचं निधन झालं आहे. त्या ७६ वर्षांच्या होत्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जायच्या. बंगळुरूमधील आपल्या राहत्या घरी झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
जयंती यांचा मुलगा कृष्ण कुमार यांनी ही दुखद बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली. २०१८ साली जयंती यांच्या निधनाची अफवा उडाली होती. तेव्हा खुद्द जयंती यांनी समोर येत आपण ठणठणीत असल्याचं सांगितलं होतं.
६ जानेवारी १९४५ रोजी कर्नाटकात जन्मलेल्या जयंती यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली होती. पुढे अभिनय, निर्मिती आणि गायनात त्यांनी नशीब आजमावलं होतं. आपल्या करिअरमध्ये त्यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम होतं. ६० व ७० च्या दशकात त्यांचा चांगलाच दबदबा होता. जेमिनी गणेशन, जयललिता अशा बड्या स्टार्ससोबत त्यांनी काम केलं होते.
तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तीन बहुरानियां, तुमसे अच्छा कौन है आणि गुंडा या बॉलिवूडच्या तीन सिनेमांत त्या झळकल्या होत्या. जयंती यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.