जळगाव (प्रतिनिधी) दारू पीत असताना आणखी दारु आणण्यासाठी मोटरसायकल मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाने आपल्या मित्राचा निर्घुण खून केल्याची घटना शहरातील शिवाजी नगर परिसरात घडली आहे.
याबाबत अधिक असे की, अरूण हरी पवार (वय-४५, रा. के.सी.पार्क, कानळदा जकात नाक्यामागे) हे शिवाजी नगर येथून दुचाकीवरून घरोघरी जावून साडी विक्री करण्याचे काम करतात. त्यांच्या परिसरात अरूण पवार यांचे मित्र हरीचंद्र उर्फ सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल (रा. इंद्रप्रस्थनगर) नवल मधुकर सपकाळे (रा. के.एच.पार्क) आणि मंगेश मधूकर जोहरे (रा. राधाकृष्ण नगर) हे राहतात. अरूण पवार हे आपल्या पत्नीला ‘तू स्वयंपाक करून ठेव मी बाहेर जावून येतो’ असे सांगून ५ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास मित्र नवल सपकाळे यांच्या सोबत दुचाकीने बाहेर गेले.
शिवाजी नगरातील बौध्द विहारजवळील चिकनच्या दुकानावर सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल उभा होता. तिघे मिळून दारू पिण्यासाठी बसले. तिघांची दारू पिऊन झाल्यान नंतर काल्या उर्फ सचिन हा अजून दारू घेण्यासाठी अरूण पवार यांच्याकडे दुचाकीची चावी मागीतली. अरूण यांनी दुचाकीची चावी न दिल्याने काल्याला राग आला त्यांने शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांनतर संतापाच्या भरात अरूण पवार यांच्या डोक्यात बाजुला पडलेली फरशी डोक्यात टाकली. यात अरूण हे गंभीर जखमी झाले. जखमीवस्थेत नवल सपकाळे यांनी गेंदालाल मील परिसरातील खासगी डॉक्टराकडे घेवून गेले व पुन्हा घटनास्थळी आणून सोडले.
हा प्रकार घडल्यानंतर पत्नी रत्नाबाई अरूण पवार यांना माहिती पडल्यानंतर त्यांनी नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत पतीला पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने देवकर जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतू वैद्यकिय अधिकारी यांनी अरूण यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी पत्नी रत्नाबाई अरूण पवार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात संशयित आरोपी हरीचंद्र उर्फ सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशीरा संशयित आरोपी सचिन उर्फ काल्या अटवाल याला शहर पोलीसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण निकम हे करीत आहे.