भडगाव (प्रतिनिधी) घर खाली करायला सांगितले म्हणून भाडेकरूंनी ५३ वर्षीय महिलेस विषारी औषध बळजबरीने पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नीला अरुण देवरे (वय ५३, रा. श्रमिक नगर नाशिक ह.मु. देव्हारी कानाशी ता. भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २९ एप्रिल २०२२ रोजी निला देवरे या अजबराव हिलाल पाटील यास सांगण्यासाठी गेले की, तुम्ही आमचे घर खाली करुन द्या. घर खाली करायला सांगितल्याचे वाईट वाटल्याने अजबराव पाटील व विकास बाबुराव पाटील या दोघांनी निला देवरे हे दोघं जवळ आले तर रोहिदास अजबराव पाटील याने निला देवरे यांना धक्का मारुन खाली पाडत त्याने कराटे नावाचे विषारी औषध बळजबरीने पाजले. एवढेच नव्हे तर अजबराव पाटील व विकास पाटील यांनी निला देवरे यांचे पती अरुण देवरे यास बांबुने मारहाण केली. विवाहितेचा अत्यवस्थ वाटत असल्याने तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असल्याचे कळते. घर मालक नीला देवरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजबराव हिलाल पाटील, रोहिदास अजबराव पाटील आणि विकास बाबुराव पाटील (तीन्ही रा. देव्हारी कनाशी ता.भडगाव) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे.
















