धुळे (प्रतिनिधी) किरकोळ वादातून एकावर कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजराज सोमनाथ लिंगायत व विशाल दगडू नेतले या दोघां मित्रांमध्ये पैशांच्या किरकोळ कारणावरून दि.५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास हाणामारी झाली होती. यावेळी गजराजने विशालला काचेचा ग्लास मारला होता. त्यामुळे विशालच्या डोळ्याजवळ दुखापत झाली होती. या वादानंतर गजराज हा घरी येऊन झोपला होता. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विशाल नेतले याने एका फळ विक्रेत्याच्या दुकानावरून नारळ कापण्याचा कोयता जबरदस्तीने उचलून नेला. त्यानंतर त्याने गजराजचे घर गाठले. यावेळी घरात गजराज झोपलेला होता व त्याचा लहान भाऊ नकुल लिंगायत हा घराबाहेर बसलेला होता.
हातात कोयता घेऊन आलेल्या विशालने घराच्या दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. नंतर हातातील कोयत्याने झोपलेल्या गजराजवर वार करुन जखमी केले. त्यानंतर त्याने तेथून पळत काढत थेट नरडाणा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गजराजचा लहान भाऊ नकुल याने दिलेल्या फिर्यादीवरून भादंवी कलम ३०७ अन्वये विशालवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु काल (दि.६) सकाळी धुळे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान गजराज याचा मृत्यू झाला. यामुळे या गुन्ह्यात ३०२ हे खूनाचे कलम वाढवण्यात आले आहे.