धरणगाव (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प झाल्यामुळे एका व्यापाऱ्याने व्याजाने घेतलेल्या कर्जासाठी धक्काबुक्की शिवीगाळ धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तब्बल ९ खाजगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, एकाच वेळी ९ खाजगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची ही धरणगाव तालुक्यातील पहिलीच घटना असून या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात व्यावसायिक विवेक वासुदेव बिचवे (रा.चिंतामण मोरया नगर) यांनी लॉकडाऊन पूर्वी व त्यादरम्यान व्यवसाय ठप्प झाल्याने भूषण राजेंद्र वाघ (रा.अमळनेर), आनंदा हिंमत सोनवणे (रा.गौतम नगर), अजय आत्माराम पवार (रा.साहिल नगर), शंकर पुना माळी (रा.संजय नगर), जयेश रणछोड चौधरी (रा.भावसार गल्ली), पंकज सुभाष मालपुरे (रा.गणेश नगर), पंकज अशोक पवार चिंतामण (रा.मोरया नगर), मनोज हिलाल भोई (रा. धरणगाव) या सर्व सावकारांकडून १० लाख ९६ हजार रुपये व्याजाने घेतले होते. बिजवे यांच्याकडून या सर्व संशयित आरोपींनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कर्ज मिळण्याबाबत वेगवेगळ्या मजकूर लिहून घेतला आहे. तसेच त्यांच्याकडून स्टेट बँके व युनियन बँकेचे कोरे चेक तारण म्हणून आरोपींनी घेतले आहेत. याशिवाय बिजवे यांनी आतापर्यंत १४ लाख १५ हजार ५०० रुपयांची परतफेड वेळोवेळी केली आहे. त्यानंतरही वरील आरोपींनी बिजवे यांच्याकडे १० टक्के व्याज प्रतिमहिना आकारून मुद्दल व व्याजासाठी धक्काबुक्की करत शिवीगाळ, धमकी देत मानसिक त्रास दिला म्हणून या संदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात गुरन ३२२५/२०२०, महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३२,३९,४५,६४ कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.करीम सय्यद हे पुढील तपास करीत आहे. खाजगीरित्या सावकारी करणाऱ्या सावकारांचा त्रास होत असल्यास पोलीस स्थानकात तक्रार देण्याबाबत धरणगाव पोलिसांकडून आव्हान देखील करण्यात आले आहे.