जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचखेडा येथील सरलाबाई सुरेश पाटील (वय ३५) या महिलेचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन विशाल नाना साबळे ( २३, चिंचखेडे बुद्रुक) याला अटक केली आहे. (Jamner Murder Case)
सरलाबाई सुरेश पाटील ही महिला चिंचखेडा येथील आपल्या घरात सोमवारी दुपारी स्वयंपाक करत होती. त्यांचे पती सुरेश पाटील हे जामनेर येथे चहाची टपरी चालवतात. त्यामुळे ते जामनेरला निघून गेले होते. शेतातील कामे चालू असल्याने गावात दुपारी शांतता होती. हीच संधी साधून अज्ञात व्यक्तीने सरलाबाई यांच्या डोक्यात कठोर वस्तूने वार केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर आरोपी पसार झाला. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आला. तर घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तपासचक्र फिरवीत अवघ्या काही तासात विशाल नाना साबळे याला अटक करत खुनाचा उलगडा केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड हे करत आहेत.
















