भुसावळ (प्रतिनिधी) येथील मुस्लीम कॉलनी परिसरात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना रायफल, बंदूका, तलवारी आणि चाकूंसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील संशयास्पद पार्श्वभूमि असणाऱ्या लोकांच्या घराची झडती घेण्याची परवानगी वरिष्ठ पातळीवरून मागण्यात आली होती. याबाबत परवानगी मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलीस स्थानकाची दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या घरांमध्ये छापेमारी केली.
दरम्यान, या प्रकरणी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला असून शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख हे दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरिक्षक दिलीप भावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जयेंद्र पगारे हे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दिलीप भागवत, सपोनि अनिल मोरे, पोहेकॉ जयराम मोरे, नेव्हील बाटली, रवींद्र बिऱ्हाडे, कृष्णा देशमुख, समाधान पाटील, प्रशांत सोनार, मीना कोळी, जयेंद्र पगारे यांच्या पथकाने केली.