सांगली (वृत्तसंस्था) शहरातील काळी खाण परिसरात धारदार शस्त्राने वार करून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली असून या हत्येनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. मात्र, अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर, शहरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, प्रदीप राजू हंकारे (वय ३०, रा. मिरज) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रदीप याचा प्लंबिंगचा व्यवसाय होता. मंगळवारी सकाळी तो दुचाकीवरून कामानिमित्त घरातून बाहेर पडला. दिवसभर तो बाहेरच होता. रात्री नऊच्या सुमारास त्याने घरात आईला फोन करून उशिराने येणार असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या काही मित्रांनी घरी फोन केला. प्रदीप दारू पिऊन विश्रामबाग परिसरात पडला असून त्याला घेऊन जा, असे त्यांनी सांगितले. बुधवारी सकाळी पोलिसांनी प्रदीपच्या घरी फोन करून त्याचा मृतदेह काळ्या खणीजवळ सापडल्याचे सांगितले. डोक्यात दगड घालून आणि धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक अजित टिके आणि निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
प्रदीप हंकारे याचा त्याच्या मित्रांनीच खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मंगळवारी रात्री त्याच्या घरी फोन करणार्या मित्रांचा शोध सुरू आहे. हल्लेखोरांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना केल्याचे उपअधीक्षक टिके यांनी सांगितले. मृत प्रदीप हंकारे हा विवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि दोन बहिणी आहेत.