नागपूर (वृत्तसंस्था) गुप्तांग ठेचून हुडकेश्वरमधील एका प्रॉपर्टी डीलरचा १९ एप्रिलला खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी प्रेयसीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.काजल अशोक जोगे (वय २७, रा. साईनगर हुडकेश्वर रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी प्रेयसीचे नाव आहे, तर रवींद्र पंडित कुडवे (५५, रा. हुडकेश्वर) असे खून करण्यात आलेल्या प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे.
कुडवे यांचे ग्रीन होम डेव्हलपर्स नावाचे फर्म आहे. त्यांचे बाजारगावजवळ पांजरा व निंबा गावात ले आऊट आहेत. शुक्रवारी १९ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास उदयनगर येथील तपस्या विद्यालयाजवळ त्यांचा जखमी अवस्थेतील मृतदेह आढळला होता. कुडवे यांच्या फ्लॅटपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर त्यांचा संशयास्पद स्थितीतील आढळून आला होता. रवींद्र कुडवे टेलरिंगचा व्यवसाय करीत होता. २०१४ नंतर त्याने हा व्यवसाय सोडून ‘प्रॉपर्टी दलाली’ सुरू केली. काही वर्षापासून त्याने स्वतःचा प्रॉपर्टी डेव्हलपर्सचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान, २०२३ मध्ये त्याच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर प्रॉपर्टीच्या व्यवसायातून त्याची एका विधवा महिलेशी ओळख झाली. २०१० मध्ये तिच्या पतीचे निधन झाले होते. एका विधवा महिलेशी ओळख, त्यानंतर तिच्याशी मैत्री झाली. रवींद्र कुडवे हा त्या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक हातभार तसेच बँकचे गृहकर्ज फेडण्यास मदत करीत होता. त्या विधवेला २७ वर्षीय मुलगी आहे. त्याने विधवा महिलेशी मैत्री केल्यानंतर त्याची नजर त्याची तिच्या मुलीवर नजर गेली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण केले.
मुलीचे रविवार, २१ एप्रिल रोजी साक्षगंध ठरले. याकरिता विधवा महिलेसह तिच्या मुलीने रवींद्र कुडवेकडे ४ ते ५ लाख रुपयांसाठी तगादा लावला. प्रेयसी हातातून जाईल या भीतीने त्याने तिला पैसे देण्यास नकार दिला. त्याने विधवा महिलेसह तिच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे सुरू केले. हा प्रकार मुलीच्या लक्षात येताच तिने १९ एप्रिल रोजी दुपारी १ ते ५ वाजताच्या सुमारास स्वीद्र कुडवे याला आकाशनगर येथील फ्लॅटवर बोलावले. तिथे त्यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यावसान भांडण व मारहाणीत झाले. यात मुलीने रवींद्रच्या गालावर, छातीवर, पोटावर, पाठीवर वार केले. त्याच्या गुप्तांगावर जाड वस्तूने मारून हत्या केली. त्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास उदयनगरच्या तपस्या विद्यालय परिसरात रस्त्याच्या कडेला तो बेशुद्धावस्थेत सापडला. मुलीने जखमी अवस्थेत त्याला एका युवकाच्या मदतीने दुचाकीवर बसवून घटनास्थळी आणून टाकल्याचे सांगण्यात येते.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच कुडवे यांच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, पण तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला. मात्र चौकशी आणि तपासाअंती आरोपी काजलने रवींद्र कुडवेची हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, रवींद्र यांची हत्या करण्यासाठी काजलला दोन ते तीन जणांची मदत केल्याचा संशय आहे. या प्रकरणात काजलची एक महिला नातेवाईकही संशयाच्या भोवऱ्यात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केल्यास अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.