धुळे (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुकटी गावात केटर्सकडील स्वयंपाकाचे काम आटोपून घरी जाणाऱ्या महिलेला निर्जनस्थळी नेत दोन अनोळखी तरुणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यांनतर खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजता घडली.
या संदर्भात अधिक असे की, पिडीत महिला एका केटर्सकडे स्वयंपाकाचे काम करते. बुधवारी रात्री शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुकटी गावात स्वयंपाकाचे काम आटोपल्यानंतर दोन जण पिडीत महिलेला घेऊन शहाद्याकडे दुचाकीने निघाले होते. त्यानंतर तिघं जण चिमठाणे चौफुलीवर रात्री दहा वाजता चहा पिण्यासाठी थांबले. याठिकाणी दोन तरुण देखील सिगारेट पित उभे होते. चहा पिऊन झाल्यावर पिडीत महिला आणि तिच्यासोबत असलेले दोघं जण दुचाकीवरून निघून गेले. परंतू रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पेडकाई मंदिराच्या अलीकडे काळ्या रंगाची दुचाकी आडवी लाऊन चिमठाणे चौफुलीवर सिगारेट पिणाऱ्या दोघं तरुणांनी पिडीत महिलेसह तिघांना अडविले. तसेच महिलेसोबत असलेल्या दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली.
एवढेच नव्हे तर आम्ही हिला बसमध्ये बसवून देऊ असे सांगत दोघांना धमकावून तेथून पळवून लावले. त्यानंतर महिलेला एका निर्जनस्थळी दोघांनी महिलेवर अत्याचार केले. नंतर महिलेला त्याचठिकाणी सोडून पळून गेले. याप्रकरणी गुरुवारी सकाळी पतीसोबत आलेल्या पिडीत महिलेने आपली आपबिती सांगता फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल दाखल करण्यात असून यातील एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले आहे.