मुंबई (वृत्तसंस्था) बंडखोर आमदार थांबलेल्या गोव्याच्या हॉटेलमधून राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. बनावट ओळखपत्र तयार करुन हॉटेलमध्ये प्रवेश केल्याचा तिघांवर आरोप आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. त्याच हॉटेलमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तिघांनी शिवसेना बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे. शिंदे गटातील आमदार शनिवारी रात्री मुंबईत परतले. गुवाहाटीमधून या आमदारांना गोव्यातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये नेण्यात आलं होतं. या हॉटेलमध्ये आमदारांशी संपर्क साधण्याच्या हेतूनं तीन जणांनी बनावट ओळखपत्राच्या सहाय्यानं हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान आणि त्यांच्यासह आणखी दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तिघांनाही शनिवारी दुपारी पणजी पोलिसांनी अटक केली आहे. बनावट ओळखपत्र दाखवून प्रवेश केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
जाणून घ्या…कोण आहेत सोनिया दुहान ?
२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. या आमदारांची सुटका करण्यात सोनिया दुहान यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.