भुसावळ (प्रतिनिधी) येथील आरपीडी रोडवरील मच्छी मार्केटच्या परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयत महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे दिसून येत आहे
यासंदर्भात अधिक असे की, आज सकाळी आरपीडी रोडवरील मच्छी मार्केटच्या परिसरात एका महिलाचा मृतदेह आढळून आला. या संदर्भात पोलीस स्थानकात माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली. या महिलेची अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तिच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार करण्यात आले आहेत. आरोपीने महिलेच्या छातीवर चाकूचे अनेक वार करून तिचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. वर्दळीच्या आरपीडी रस्त्यावर पोलिस चौकी क्रमांक सात असून या चौकीच्या मागे असलेल्या निर्जनजागी ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. दरम्यान, ही महिला नेमकी कोण आणि कुठली रहिवासी ? याबाबतची माहिती अद्यापही पोलिसांना मिळालेली नाही. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.