नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीच्या बाहेर सिंधू सीमेवर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्यानं खळबळ उडाली आहे. हत्याऱ्यांनी या युवकांची हत्या करून त्याचा मृतदेह बॅरिकेट्सला बांधला. याची माहिती मिळाल्यानंतर कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळावर येऊन मृतदेह खाली घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी हा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलाय.
तरुणाचा मृतदेह सकाळी सिंघू सीमेवर आंदोलकांच्या मुख्य स्टेजजवळ लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याचे वय ३५ वर्षांच्या आसपास आहे. तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणा सापडल्या आहेत. ठार झालेल्या तरुणाचा हात मनगटातून कापला गेला आहे. या खुनाचा आरोप निहंग्यांवर केला जात आहे. दरम्यान, या हत्येमागील निश्चित कारण अद्यापही समोर आलेलं नाही.
दरम्यान, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकरी तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. या आंदोलनाला ९ महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठकाही झाल्या, पण आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकर्यांचे म्हणणे आहे की ते कृषी कायदे मागे घेण्यापूर्वी आंदोलन स्थळावरुन हलणार नाहीत. त्याच वेळी, सरकार म्हणते की ते कायदे मागे घेणार नाही, परंतु शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे संभाव्य बदल करण्यास तयार आहे.