कडा (वृत्तसंस्था) एका नराधमाने शरीरसुखासाठी पीडित अल्पवयीन मुलीच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन तिला ब्लॅकमेल करून तिचं लैंगिक शोषण केलं आहे. एवढंच नाही तर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेकडून 15 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शुभम श्रीमंत सोनवणे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तर १६ वर्षीय पीडित मुलगी मनोरुग्ण आहे. आरोपी शुभम याने दारुच्या नशेत अनेकदा पीडितेला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. नग्न फोटो पाठव नाहीतर, घरी येऊन सर्व प्रकार सांगेन, अशी धमकी आरोपीनं दिली होती. आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित मुलीने आपले नग्न फोटो आरोपीला पाठवले होते.
त्यानंतर संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेचं अनेकदा लैंगिक शोषण केलं आहे. आरोपीनं १५ हजार रुपये घेऊन हॉटेलवर ये, अन्यथा फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देखील दिली. यानंतर आरोपीनं पीडितेकडून १५ हजार रुपये उकळून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने पीडित मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह, समाजात बदनामी केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.