बंगळुरू (वृत्तसंस्था) बंगळुरूतील एका शैक्षणिक संस्थेत सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेचा खुलासा करण्यात आला आहे. बाप लैंगिक अत्याचार करत असल्याचे मुलीने तिच्या वर्गमित्रांना सांगितले होते. त्यानंतर अल्पवयीन मित्रांच्या मदतीने तिच्या बापाची हत्या केली.
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या आणि एका शैक्षणिक संस्थेत सिक्युरिटी मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा त्याच्या मुलीने मित्रांच्या मदतीनं खून केल्याचं उघड झालं आहे. कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी तिच्या मित्रांना वडिलांबाबत नेहमी सांगत असे. वडिलांकडून तिची आणि तिच्या बहिणीची होणारी लैंगिक छळवणूक असह्य होत असल्याचं तिनं मित्रांना सांगितलं होतं. घटनेच्या काळात मुलीची आई बाहेरगावी गेल्याचं निमित्त साधत सर्वांनी मिळून मुलीच्या वडिलांचा खून करण्याची योजना आखली. दुपारी साडेबारा वाजता मुलीच्या घरात तिचे मित्र घुसले आणि तिच्या वडिलांवर हातोड्याने वार केले. या हल्ल्यात वर्मी घाव लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. खून करून हे मित्र घरातून निघून गेल्यावर मुलीने तिच्या बहिणीला झोपेतून जागं केलं. दोघी मिळून शेजारी गेल्या आणि आपल्या वडिलांवर कुणीतरी हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केल्यावर तपासाची चक्रं फिरायला सुरुवात झाली.
मुलीच्या वडिलांचा खून होण्याचं कुठलंच तार्किक कारण पोलिसांना मिळत नव्हतं. मात्र मुलीची जबानी सतत बदलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. दरवेळी मुलगी वेगळीच माहिती देत असून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय़ आल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली. मुलीकडे खोदून चौकशी केल्यावर तिने हत्येची कबुली दिली आणि मित्रांच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचं सांगितलं. सर्व आरोपी अल्पवयीन असून आपल्या मैत्रिणीची त्रासातून सुटका करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.