नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या दिल्लीत खलबतं सुरु आहेत. मुंबईत झालेल्या भेटीनंतर दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा या दोघांमध्ये चर्चा होत असल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, शरद पवार हे काल दिल्लीला पोहोचले आहेत. तीन दिवस ते दिल्लीला असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेतली आणि त्यानंतर ते दिल्लीत दाखल झाले. आगामी २३ जूनपर्यंत राजधानीमध्येच ते असणार आहेत. शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. आज प्रशांत किशोर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी पोहोचले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होत आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मागील आठवड्यातच प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली होती. तब्बल ३ तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत देशासह राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात नव्याने रणनीती आखण्यात यावी, यासाठी काय नियोजन केले जावे, महाराष्ट्र विधानसभेत कशा पद्धतीने रणनीती आखली जावी, यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने नियोजन करावे, काय समीकरण आखले जावे, मतदारसंघनिहाय कसे नियोजन असावे, याबद्दलही किशोर यांनी भाष्य केले.
या मुद्यांवर झाली होती चर्चा ?
देशपातळीवर विरोधकांकडे एक आश्वासक चेहऱ्याची गरज आहे. त्यासाठी सामूहिक नेतृत्व आणावे लागणार आहे. याआधी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात लढत पाहण्यास मिळाली. पण, आता परिस्थितीत बदलली असून असं चित्र पुन्हा पुढे येऊ नये, यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली.
काय म्हणाले होते महाविकास आघाडीचे नेते
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, प्रशांत किशोर यांनी त्यांचं क्षेत्र सोडलं आहे. पवार साहेबांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं भेटत असतात, असं ते म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला निवडणुकांमध्ये यश मिळालं आहे. ते जाणून घेण्यासाठी अनेक नेते इच्छुक असतात. या बैठकीत गैर काय आहे, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला होता. तर छगन भुजबळ म्हणाले की, प्रशांत किशोर यांचा निवडणुकीबाबत चांगला हातखंडा आहे. मात्र शरद पवार आणि त्यांच्या भेटीत काय घडलं याबाबत कल्पना नाही.