मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद बेकायदेशीर असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक अजित पवार यांनी जारी केले आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी फोडण्याच्या कटात निवडणूक आयोगही सामिल असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने बुधवारी शरद पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. तसेच अजित पवार पक्षाचे नवे अध्यक्ष असल्याचा प्रस्तावही पारित केला. प्रफुल्ल पटेल यांनी बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे, अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एका पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावरही दावा सांगितला आहे. यासंबंधीचे 40 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे एक पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावरच दावा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ आणि संघटनात्मक दोन्ही विभागातील बहुसंख्य सदस्यांनी एक ठराव पारित केला आहे. ज्याद्वारे अजित अनंतराव पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षांपैकी एक होते आणि अजूनही आहेत. राष्ट्रवादीने अजित पवार यांची महाराष्ट्र विधानसभेतील राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी प्रचंड बहुमताने मंजूरी दिली आहे. अध्यक्षपदासह राष्ट्रवादी कॉंग्रेसची संपूर्ण रचना मोठ्या प्रमाणात सदोष आहे, कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटनेतील तरतुदींनुसार कोणतीही नियुक्ती केलेली नाही. अध्यक्षपदासह कोणत्याही पदासाठी निवडणूक प्रक्रिया पाळण्यात आलेली नाही.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी फोडण्याच्या कटात निवडणूक आयोगही सामिल असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आव्हाड म्हणाले की, अजितदादा गटाचे लोक ३० तारखेला निवडणूक आयोगाकडं गेले आणि ५ तारखेला आयोग सांगतंय की ते आमच्याकडं आले होते. का निवडणूक आयोगाला याआधी हे कळवता आलं नाही? म्हणजे हा कटाचा, षडयंत्राचा भाग आहे. यामध्ये इलेक्शन कमिशन देखील सामिल आहे. हे फसवाफसवीचे उद्योग आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राला बॅकडेटेट करायला किती वेळ लागतो?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदावर देखील अजित पवार गटाने दावा ठोकल्यामुळे आता निवडणूक आयोग शरद पवार गटाच्या की अजित पवार गटाच्या बाजूने निकाल देतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.