मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनानंतर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी(नाणार)’ सारखा प्रकल्प हातातून गमावणं कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अशी भूमिका मांडल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेनेनं सावध भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी फोन करून भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे.
कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प हा राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊन देऊ नका, असे पत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांना पाठवले होते. हे पत्र वाचल्यानंतर शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केल्याची माहिती राज ठाकरे यांनी सोमवारी कृष्णकुंजवर जमलेल्या नाणार प्रकल्प समर्थकांना ही माहिती दिली.
मी नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे आता नाणार प्रकल्पाविषयीच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने बासनात गुंडाळलेल्या या प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नाणार प्रकल्प समर्थकांनी सोमवारी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आमचं हे एक काम तेवढे मार्गी लावा. आम्ही तुमचे काय ऋणी राहू, अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, राज्यात, देशात गुंतवणूक यावी ह्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. मध्यंतरी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बेंगळुरूत गेला आणि तो महाराष्ट्रात परत यावा ह्यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरु आहे हे मी वाचलं. ही बातमी क्लेशदायक होती. आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये, असं मत राज ठाकरेंनी पत्रातून मांडलं आहे.
















