जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांचा राजीनामा घेतला नाहीतर बच्चू कडू यांच्याविरोधात पडद्यामागून वेगळं कारस्थान सुरु असल्याचा संदेश जाईल, असे मत शिवसेनेच्या (ठाकरे गट) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. त्या मंगळवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
सुषमा अंधारे यांनी म्हटले की, रवी राणा यांनी नुसती माघार घेऊन कसे चालेल. मला वाईट वाटतं, बच्चू कडू आमचा भाऊ आहे. रवी राणा त्यांचा अशाप्रकार अपमान करु शकत नाहीत. रवी राणा यांनी अक्षम्य चूक केलेली आहे. तुम्ही एका मान्यताप्राप्त लोकप्रतिनिधीचे प्रतिमाहनन करता, त्याच्या प्रतिमेला आणि विश्वासर्हतेला तडा जाईल, अशी वक्तव्यं करता. त्यामुळे अशी सवंग, उथळ आणि बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या सदस्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्याची जबाबदारी राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. विधानसभेत रवी राणा यांची आमदारकी रद्द करण्याचा ठराव मांडला पाहिजे. फक्त माफीने काम चालणार नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी असा समज होईल की, तुमचं पडद्यामागून वेगळं कारस्थान सुरु आहे, असे अंधारे यांनी म्हटले. सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम सुरू आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. मात्र, मुंबई व सिंधुदुर्ग महाराष्ट्रपासून वेगळं करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे, असेही अंधारे यांनी म्हटले.