शिर्डी (वृत्तसंस्था) शिर्डी जवळील सावळीविहीर गावात जावयाने पत्नीची, मेव्हण्याची आणि आजे सासूची धारदार शस्राने वार करुन निर्घृण हत्या केली. या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. तर संशयित जावईला अटक करण्यात आली आहे.
या हत्याकांडात वर्षा सुरेश निकम (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय २५), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजे सासू, वय ७०) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच चांगदेव द्रोपद गायकवाड (सासरे, वय ५५), संगीता चांगदेव गायकवाड (सासू, वय ४५), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, रात्री अचानक आरोपी सुरेश निकम आले. दरवाजा उघडल्यानंतर लगेच वार करण्यास सुरूवात केली. पाच ते दहा मिनिटात सहा जणांवर वार केल्यानंतर सुरेश पळून गेला.
यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत संशयित सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पाेलीसांनी व्यक्त केला आहे. संशयिताविराेधात शिर्डी पोलीस ठाण्यात खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे आज वृत्त ‘साम’टीव्हीने दिले आहे.