मुंबई (वृत्तसंस्था) किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व अनेक नेत्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. अनेक वर्षांपासून शिवजयंती निमित्त शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला जातो. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.
किल्ले शिवनेरीवर उत्साहाचं वातावरण असून शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती आहे. कार्यक्रमात पोलिसांकडून महाराजांना मानवंदना देण्यात आली. ढोलताशांचा गजर आणि पोवाड्यांचा आवाज संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावर दुमदुमतोय. शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे शिवभक्तांसाठी उत्साहाचा दिवस असतो. आज शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली जात आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरात अनेक ठिकाणी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी केली जात आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातही आज शिवजयंती साजरी केली जात आहे. दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर आज राज्यातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. प्रकृती अस्वस्थामुळे मुख्यमंत्र्यांना शिवनेरी किल्ल्यावरील कार्यक्रमाला यायला जमलं नाही, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.