नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागलेले आहे. येथे भाजपा (BJP) आणि समाजवादी पक्षात (Samajwadi Party) थेट लढत होत असताना शिवसेनेनंही (Shiv Sena) आता निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. आज झांशी येथे शिवसेना आणि किसान रक्षा पक्षाच्या नेत्यांमध्ये आघाडीसाठी खलबतं झाली. किसान रक्षा पक्ष गेल्या २५ वर्षांपासून बुंदेलखंड किसान महापंचायत संघटनेसाठी काम करत आहे.
आघाडीसाठीची प्राथमिक चर्चा यशस्वी झाली असून येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय शिवसेनेच्या नेतृत्त्वाकडून घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे. शिवसेना आणि किसान रक्षा पक्ष बुंदेलखंडातील सर्व १९ विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवेल असा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरी आज शिवसेनेसोबत आहे हे यातून सिद्ध होतं असं शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आणि किसान रक्षा पक्षात झालेल्या बैठकीत किसान रक्षा पक्षाचे अध्यक्ष गौरीशंकर बिदुआ, महासचिव विजयकुमार कर्ण, अनिल कुमार आणि शिवसेनेचे बुंदेलखंड प्रभारी तसंच प्रदेश उपप्रमुख राजेश साहु, शिवसेना किसान प्रतिनिधी संदीप गिड्डे पाटील, संतोष खटीक, ममता कश्यप, मंडल प्रमुख प्रमोद श्रीवास्तव, मनोज शर्मा, फुलचंद विश्वकर्मा आणि ब्रिजेश जोशी उपस्थित होते.