जळगाव (प्रतिनिधी) महानगर पालिकेचे सत्तांतर झाल्यानंतर महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेणार असल्याचे महापालिकेतील शिवसेनेचे नेते सुनील महाजन यांनी सांगितले आहे.
या बाबत विरोधी पक्षनेते नेते सुनील महाजन म्हणाले, महापौर जयश्री महाजन व मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेणार आहोत, ते राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आहेत, महापालिकेत सत्तांतर घडवून आणण्यात त्यांचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना भेटणे काय चुकीचे आहे. ते काय आता भाजपचे नेते नाहीत. राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, जळगावच्या विकासाबाबत त्यांचे आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत.