मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार भावना गवळी सध्या ईडीच्या रडावर आहेत. ईडीने भावना गवळी यांना समन्स पाठवलं आहे. खासदार भावना गवळी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. पण दीड तास त्या ‘वर्षा’ बंगल्यावर वाट बघत होत्या. पण दीड तास वाट बघूनही मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने त्या ‘वर्षा’वरुन परतल्या.
भावना गवळी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा या शासकीय निवास्थानी पोहोचल्या होत्या. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, जवळपास दीड तास त्या वर्षा बंगल्यावर प्रतीक्षा करत थांबल्या होत्या. पण, त्यांना भेटीसाठी वेळच देण्यात आला नाही. एवढंच नाहीतर त्यांना कोणताही निरोप देण्यात आला नाही. त्यामुळे ताटकळलेल्या भावना गवळी यांना पक्षप्रमुखांची भेट न घेतात माघारी परतावे लागले.
भावना गवळींच्या कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक झाली आहे. त्यानंतर भावना गवळींना ईडीकडून समन्स आले आहे. त्यानुसार आता भावना गवळी यांना येत्या ४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे गवळी या भेट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या.
दरम्यान, भावना गवळी यांच्या संबंधित असणाऱ्या ९ ठिकाणांवर ED ने छापेमारी केल्यानंतर, परभणी येथील पाथरी याठिकाणी ED ने मंगळवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी EDच्या अधिकाऱ्यांनी भावना गवळी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान यांना अटक केली आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचं कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. सईद खान हे संबंधित कंपनीचे संचालक आहेत. सईद खान यांना अटक केली असून ते भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचा कारभार पाहात होते. हरीश सारडा यांनी तक्रार केल्यानंतर ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.